शिवसैनिकांचे "शिवसेनाप्रमुख"

साधारणतः १७-१८ वर्षांपूर्वी मुंबई उपनगरातील भांडुप (पूर्व) येथून आम्ही शिवसैनिकांनी आपल्या विभागात शिवसेनेची उपशाखा असावी या एका ध्येयापोटी प्रयत्न सुरू केले. त्यावेळची मुख्य शिवसेना शाखा क्र. २०८ कांजूरमार्ग येथे होती. परंतु आमच्या विभागापासून फारच दूर असल्याने जनतेला संपर्क साधण्यासाठी खूपच त्रास होत होता. उपशाखेचा ‘मानस’ आम्ही विभागीय नेते आमदार लीलाधरजी डाके, विभागप्रमुख दत्ताराम गुजर आणि शाखाप्रमुख अशोक पावसकर यांच्या कानावर घातला. होय-नाही करता करता रीतसर आदेश मिळाल्यानंतर ‘चॅरिटी शो आणि स्मरणिका प्रकाशन’ हा कार्यक्रम सर्वानुमते आयोजित केला.

शाखाप्रमुखांशी समन्वय साधून स्मरणिकेचे प्रकाशन आणि कार्यक्रमास शिवसेनाप्रमुखांनीच यावे ही एकच अट ‘बारा हत्तीचे बळ’ आलेल्या आम्ही शिवसैनिकांनी शाखाप्रमुखांना बोलून दाखवली. शाखाप्रमुखांनीही सर्व शिवसैनिकांच्या समक्ष मातोश्रीला दूरध्वनी केला आणि प्रकाशनाची वेळ ठरविण्यात आली. आणि मग आम्हा शिवसैनिकांना आकाश ठेंगणे झाले. दिवस रात्र धावपळ करून स्मरणिका प्रकाशनासाठीची पूर्तता पूर्ण करून ठरलेल्या दिवशी म्हणजे २४ डिसेंबर २००० रोजी आम्ही सर्व शिवसैनिक शाखाप्रमुखांसोबत आमच्या पंढरपुरात म्हणजेच ‘मातोश्री’मध्ये हजर झालो.

सकाळी साडे दहा वाजता मातोश्रीच्या दिवाणखान्यात आम्ही पोचलो. आमच्या अगोदर सिनेअभिनेते महेश कोठारे, उद्योगपती, साहित्यिक आणि विविध क्षेत्रातील मातब्बर मंडळी शिवसेनाप्रमुखांना भेटण्यासाठी ठाण मांडून बसली होती. त्यांच्या भाऊगर्दीत आम्ही शिवसैनिक एकमेकांकडे बघत भेटीस वेळ लागणार म्हणून काहीसे नाराज परंतु उल्हसित आणि उत्सुक होतो. देवतुल्य शिवसेनाप्रमुख ‘प्रत्यक्ष’ कसे दिसतात, कसे बोलतात याची उत्सुकता शिगेला पोचली होती. दाटीवाटीने उभे असताना ‘पिन ड्रॉप सायलेन्स’ प्रकार काय असतो तो आम्ही त्यादिवशी अनुभवत असतानाच रवी म्हात्रे जिन्यावरून धावपळ करीत उतरले आणि म्हणाले, ‘साहेब… येताहेत….’

अरे बापरे, चिडीचूप सर्व एकसाथ उभे राहिले. प्रत्येकजण श्वास रोखून जिन्याच्या दाराकडे रोखून पाहू लागला. आणि शिवसेनाप्रमुखांचे आगमन झाले. त्यांनी ‘सर्वांना जय महाराष्ट्र!!!’ अशा भारदस्त आवाजात नमस्कार करून ते दारातच उभे राहिले. त्याबरोबर आमच्या अगोदर प्रस्थान झालेले सर्व मातब्बर त्यांना मानवंदना देऊ लागले. त्यामुळे आम्ही सर्व शिवसैनिक मागेच राहिलो. एकमेकांकडे पाहत थोडे हिरमुसले झालो खरे…. तेवढ्यात, ‘अरे…. सर्वजण थांबा, माझा शाखाप्रमुख अशोक कुठेय? आणि भांडुपचे सर्व शिवसैनिक पुढे या आधी..’ शिवसेनाप्रमुख बोलल्यानंतर आम्ही एका आवेशात पुढे गेलो.

पांढरा शुभ्र पेहराव, गळ्यात रुद्राक्षांच्या, स्फटिकांच्या माळा, डोळ्यावर काळा चष्मा आणि कमालीची प्रसन्न मुद्रा आम्ही पाहतच असताना शाखाप्रमुखांनी त्यांच्या हाती पुष्पगुच्छ दिला. ‘खूप खूप धन्यवाद..’ असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांच्यासोबत शाखाप्रमुखांनी प्रस्तावित उपशाखेच्या उभारणीची माहिती आणि विभागातील संघटनात्मक बाबींवर चर्चा केली. त्यानंतर माझ्या हातामध्ये असलेल्या स्मरणिका त्यांच्या समोर ठेवल्या, त्याचे प्रकाशन त्यांनी केले. एक स्मरणिका स्वतःच्या हातामध्ये घेऊन ती पहिल्या पानापासून त्यांनी बघावयास सुरुवात केली. आतापर्यंत सर्व वातावरण तंग, शांत होते. अचानक शिवसेनाप्रमुख धीर गंभीर स्वरात म्हणाले ‘अरे… भांडुपमध्ये हेअर कटिंगवाल्यांनी काय प्रॉब्लेम केला आहे??’

बापरे… आम्ही सर्वजण एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहू लागलो. कुणाला काही सुचेना. तेवढ्यात शाखाप्रमुख खाली मान घालून अदबीने म्हणाले ‘साहेब…. काही नाही सर्व ठीक आहे’ परत सर्वांकडे त्या काळ्या चष्म्यातून पाहत माझ्या व इतर काही शिवसैनिकांच्या वाढलेल्या दाढीकडे बोट दाखवत शिवसेनाप्रमुख म्हणाले ‘अरे…. मग हे काय??’ क्षणात गंभीर वातावरण हास्यकल्लोळात बुडाले.

‘साहेब… स्मरणिका प्रकाशनाच्या सर्व कामामुळे दाढी करता आली नाही…’ शाखाप्रमुखांनी आमची बाजू कशीबशी मांडली. त्या हास्यविनोदात आम्हा सर्वांची आदरयुक्त भीती निघून गेली. ‘बर, स्मरणिकेत काही वेडे वाकडे नाही ना?? असेल तर भांडुपला येऊन तुमचे लंगोट सोडीन..’. व त्यानंतर ‘परत एकदा सर्वजण येथे आलात, धन्यवाद…’ असे म्हणत आम्हाला सर्वांना त्यांनी आशीर्वाद दिला. त्यांच्या सोबत फोटो काढताना देखील प्रत्येक शिवसैनिकांची ते आस्थेने चौकशी करत होते. शिवाय विभागातील संघटनात्मक बाबींचा आढावा शाखाप्रमुखांकडून घेत होते.

आज एवढ्या वर्षांनीही या सुगंधित आठवणीने मन मात्र शोकाकूल होते. पण ‘रडायचं नाही…. लढायचं’ या शिवसेनाप्रमुखांच्या मंत्राने आजही आम्हा शिवसैनिकांना नवसंजीवन मिळते. असे होते आम्हा शिवसैनिकांचे ‘शिवसेनाप्रमुख’.
- मंगेश धोंडी गावडे
(उपाध्यक्ष, मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानिय लोकाधिकार समिती)

Comments